Dhule Crime Report :
धुळे : धुळ्यात चौकोनी कुटुंबाची अकाली अखेर झाल्याने अख्खा महाराष्ट्र हादरला. देवपुरातील प्रमोदनगर भागातील खते, बियाणे विक्रेता प्रवीण मानसिंग गिरासे यांनी राहत्या घरात पत्नी आणि दोन्ही मुलांना विषारी औषध देऊन जीवे ठार मारले. यानंतर गळफास घेत आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र गिरासे कुटुंबीयांच्या नातेवाइकांकडून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचे गूढ आणखी वाढले आहे.
नेमकं काय घडलं?
देवपुरातील इंदिरा गार्डननजीक असलेल्या प्रमोद नगर सेक्टर नंबर पाच येथील समर्थ कॉलनी प्लॉट नं. ६ येथे प्रवीण मानसिंग गिरासे कुटुंबासह राहत होते. मूळचे धुळे तालुक्यातील लोणखेडे गावातील असलेल्या प्रवीण यांचे शहरात कामधेनू नावाचे खते, बियाणे विक्रीचे दुकान आहे.
सोमवारी (दि. १६) रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे दूध घेऊन ते घरी गेले होते. यानंतर कॉलनी व परिसरात चौघे जण आढळून आले नाहीत. प्रवीण गिरासे यांच्या घरासमोरच त्यांची बहीण मनीषा गिरासे यांचे घरदेखील आहे. दादा, वहिनी किंवा भाचे दिसत नसल्याने बहिणीने मोबाइलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रिंग जात होती. परंतु कोणाकडून प्रतिसाद मिळत नव्हता.
अखेर बहीण गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास भावाकडे गेली. भावाच्या घरातून तिला दुर्गंधी येत होती. लोटलेला दरवाजा उघडला असता पहिल्या मजल्यावर भाऊ प्रवीण याने हॉलमध्ये गळफास घेतल्याचे आढळून आले. तर बेडरूममध्ये भावजय दीपांजली, भाचा नितेश आणि सोहम हे सर्व मृतावस्थेत आढळून आल्याने तिने एकच हंबरडा फोडला.
सुसाईड नोट आढळली
देवपुरात गिरासे कुटुंबियांनी राहत्या घरात आत्महत्या केली. यावेळी प्रवीणसिंग गिरासे यांच्यानजीक पोलिसांना एका सुसाईड नोट आढळून आली. यात आम्ही सर्वजण आत्महत्या करीत असून आमच्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही, असे त्यात नमूद केले आहे. याबाबीला सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार देवरे यांनी दुजोरा दिला.
नातेवाईक म्हणतात, ते आत्महत्या करुच शकत नाहीत
मृत प्रवीण गिरासे व त्यांची पत्नी दीपांजली गिरासे हे मनमिळावू स्वभावाचे होते. प्रवीण गिरासे यांचे लामकानी, तसेच धुळे शहरात खते बि-बियाणे विक्रीचे दुकान आहे. तसेच नितेश व सोहम दोन्ही मुलेदेखील हुशार होते. नितेश हा नुकताच बारावी उत्तीर्ण झाला होता. मुंबई येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. तर सोहम अकरावीला होता.