मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एक सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. या योजनेला चांगलाच प्रतिसात मिळत असून आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले आहेत.
अर्ज मंजूर झालेल्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा झाले आहेत, दरम्यान या योजनेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता सप्टेंबर महिन्यातही सरकारकडून या योजनेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला आहे, त्यांना पैसे कधी मिळणार? याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आली नव्हती, मात्र आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात मोठा खुलासा केला आहे. ते नागपूरमध्ये आयोजित बांधकाम कामगार मेळाव्यात बोलत होते.
ज्या महिलांनी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबर महिन्यात या योजनेचा अर्ज भरला आहे, त्या महिलांना या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे मिळतील असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही या योजनेंतर्गत वर्षाला 11 हजार म्हणजेच दर महिन्याला दीड हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करत आहोत.
यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस कोर्टामध्ये गेलं आहे. मात्र मी सांगतो ही योजना कधीही बंद होणार नाही. सुरूच राहणार आहे. आम्ही कोर्टात सांगितलं आहे की या योजनेसाठी आम्ही बजेटमध्ये पैसा ठेवला आहे. आम्ही कोणतीही योजना हवेत आणलेली नाही. आधीच्या कोणत्याही योजनेला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे काँग्रेसने कितीही विरोध केला तरी ही योजना बंद होणार नाही असा मी शब्द देतो असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.