कोल्हापुरातून पुण्याला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे सोमवारी 16 सप्टेंबरला उद्घघाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज शनिवारी चाचणी घेण्यात आली आहे. आज वंदे भारत सकाळी 10 वाजून 25 मिनिटांनी कोल्हापुरातून पुण्याला रवाना झाली आहे. सोमवारी दुपारी सव्वा चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सोमण्णा यांच्या उपस्थितीत या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम निश्चित झाल्यामुळे शनिवारी चाचणी घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला.
त्यानुसार सकाळीच भगव्या रंगाची वंदे भारत कोल्हापुरात दाखल झाली. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी इंदूराणी दुबे, ब्रिजेश सिंह, मिलिंद हिरवे, डॉ. रामदास भिसे, विकास श्रीवास्तव, महेश्वरी, कोल्हापूर स्टेशन प्रबंधक मेहता, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी उपस्थित होते. या एक्सप्रेसबद्दल छत्रपती शाहू महाराज रेल्वे टर्मिनसवरील प्रवाशांनाही मोठी उत्सुकता होती.
हुबळी ते पुणे व पुणे ते हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसला मंजुरी मिळाल्यानंतर रेल्वेने अचानक या मार्गात बदल करून याच गाडीला कोल्हापूरचा थांबा दिला होता. मात्र, वळसा घालून प्रवास होणार आहे. त्यात प्रवासाचा वेळ अडीच ते तीन तासांनी वाढणार असल्याने कर्नाटक व महाराष्ट्रातील आमदार, खासदारांनी अशा मार्गास विरोध केला.त्यातच सांगलीचा थांबा रद्द केल्यानंतर सांगलीच्या नागरिक जागृती मंचने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मेलद्वारे तक्रार करत काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला होता. पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेत रेल्वे मंत्रालयाला आदेश दिले. त्यानंतर कोल्हापूर व हुबळीसाठी दोन स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील देण्यात आला. सायंकाळी रेल्वेचे कोचिंग विभागाचे संचालक संजय नीलम यांनी दोन्ही एक्स्प्रेसचे वेळापत्रक जाहीर केले.
कोल्हापूर ते पुणे वंदे भारत (क्र. 20673) ही प्रत्येक मंगळवार, शनिवार व सोमवारी धावणार असून, पुणे ते कोल्हापूर वंदे भारत (क्र. 20674) ही प्रत्येक बुधवार, शुक्रवार व रविवारी धावणार आहे. तर हुबळी ते पुणे वंदे भारत (क्र. 20669) ही बुधवार, शुक्रवार व रविवारी पहाटे 5 वाजता सुटेल आणि दुपारी 1.30 वाजता पुण्यात पोहोचेल तर पुणे ते हुबळी (क्र. 20670) ही गुरुवार, शनिवार व सोमवारी दुपारी 2.15 वाजता सुटेल आणि रात्री 10.45 वाजता हुबळीत पोहोचेल. या गाडीला धारवाड, बेळगावी, मिरज , सांगली, सातारा असे 5 थांबे आहेत.
कोल्हापूर-पुणे वंदे भारतची अशा असतील वेळा – कोल्हापूर ते पुणे वंदे भारत सकाळी सव्वा 8 वाजता कोल्हापुरातून निघेल. मिरजेत 9 वाजता, सांगलीत सव्वा नऊ वाजता, किर्लोस्करवाडीत 9.42 ला, कराडला 10.07, साताऱ्यात 10.47 तर पुण्यात 1.30 वाजता पोहोचेल. तर पुण्यातून परतणारी गाडी दुपारी सव्वा 2 वाजता सुटणार असून, साताऱ्यात 4.37, कराडला 2.25, किर्लोस्करवाडीत 5.50, सांगलीत 6.18, मिरजेत 6.40 तर कोल्हापुरात 7.40 वाजता पोहोचेल.